पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!

स्रोत इंटरनेट 
 आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. 

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.

वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.

वारकरी महावाक्य-

वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरू तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते.  

वारीचे दोन प्रकार आहेत.

आषाढी वारी - सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात.

कार्तिकी वारी - संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.

या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.

पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

वारीदरम्यानचे वारकरी भजन

हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.

ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा[१८] ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.[१९] श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.

तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.

दिंडी सोहळा

वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.[२१] वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते.

आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र्रचे मुख्यमंत्री सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!